मराठी काव्यपरंपरेतील तुकोबांचे स्थान हा खरे तर चर्चेचा विषय राहिला नाहीच. वेगवेगळ्या काळात तुकोबांच्या या सर्वोच्च स्थानाचे कोणी समर्थन करीत तर कोणी त्याला विरोध करीत म्हणजेच त्याचा खुंटा हलवून हलवून इतका बळकट केलेला आहे की त्याबद्दल आता शंका घेण्यासही वाव नाही. मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सर ऍलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी असे म्हटले. तर अलीकडे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी आपण तुकोबांशिवाय कविता या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. असे सांगून महाकवी या नात्याने तुकोबांच्या विश्वकाव्यातील स्थानावर शिक्कामोर्तब केले.
परंतु मुद्या केवळ तुकोबा कवी म्हणून किती श्रेष्ठ आहेत हा नाही. तुकोबांच्या अवतार समाप्तीला आता साडेतीनशे वर्षे होऊन गेली. मधल्या काळात इतिहासाच्या पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेले. साहित्यासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही. ही सर्व परिवर्तने आणि उलथापालथी जमेस धरूनही तुकोबांचे आजच्या मराठी कवीशी आणि माणसाशी काही नाते आहे का? तो तुकोबांच्या परंपरेचा पाईक होऊ शकतो का? हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नकारार्थी आले तर तुकोबा आणि त्यांची कविता हा एक ऐतिहासिक चर्चेचा व स्वारस्याचा विषय ठरेल आणि या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर येणे पुरेसे नाही. तुकोबांच्या प्रमाणे काव्यव्यवहार आणि जीवनव्यवहार करणारे निदान तो करण्याचा प्रयत्न करणारे कोणी असतील तरच अशा उत्तराला काही एक अर्थ प्राप्त होतो. तुकोबांची जीवनमूल्ये आणि काव्यमूल्ये हाच निकष या संदर्भात वापरावा लागतो.
ज्या कवींमुळे या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळणे शक्य होते त्यात स्वत: चित्र्यांचा समावेश अर्थातच होतो. त्याच बरोबर भालचंद्र नेमाडेप्रभृती समानधर्मीचाही समावेश होतो. श्रीकृष्ण राऊत यांचाही अंतर्भाव आता यात करावा लागणार आहे आणि प्रस्तुत कविता संग्रह त्यासाठी पुरेसा आहे. स्वत: राऊत आपणाला तुकोबांच्या परंपरेतील मानतात. त्यांच्या कवितांची वाटचाल तुकोबांचे बोट धरूनच झालेली आहे. तुकोबांच्या संदर्भात अस्तित्व आणि कवित्व यांच्या अद्बैत असल्यामुळे तुकोबांचे जगणे एकीकडे ठेऊन केवळ शैलीच्या वा शब्दकळेच्या पातळीवर त्यांचे वरवरचे अनुकरण करणे यात तसा काही अर्थ उरत नाही. अर्थात तसे करता येणे शक्य नाही वा तसे कोणी करीत नाही असे मात्र नाही. पण अशा काव्यकसरतीचे पितळ उघडे पडायला फारसा वेळ लागत नाही. या बाबतीत फसवणूक करणे तितकेसे सोपे नाही.
राऊतांच्या अनेक कविता खुद्द तुकोबांना उद्देशून किंवा तुकोबांच्या विषयी आहेत आणि उरलेल्यांपैकीही बहुतेक तुकारामी बाण्याचा आहेत. त्यामुळे त्या अभंग छंदात असणे अर्थातच साहजिकही आहे. अभंग हा छंद मराठी भाषेच्या प्रकृतीशी सुसंगत तर आहेच परंतु शिवाय तो सरळ, रोखठोक अशा मराठी संस्कृती स्वभावाशीही सुसंगत आहे. तुकोबांसारख्याच संतकवींनी अभंगांमधून देवाशी संवाद साधीत त्यांना उपदेश केला. ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे त्याला फसवता येत नाही. स्वत:ला फसवायला प्रश्नच उद्भवत नाही आणि ज्यांना उपदेश करायचा त्यांना फसवण्याचे संतांना काही प्रयोजन नव्हते. त्यांना त्यातून काही साधायचे नव्हते. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही आपोआपच अभंगाची वैशिष्ट्ये बनतात. तिथं लटपट आणि खटपट यांना वाव नाही. सजावटीला संधी नाही.
कवीचे तुकोबांशी असलेले नाते उलगडणार्या अनेक कविता या संग्रहात आहेत. परंतु त्याचा परामर्श घेण्यापूर्वी आणखी एका बाबीचा खुलासा करायला हवा. हा आधुनिक कवी तुकोबांना त्यांच्या परंपरेसह स्वीकारणारा आहे. या परंपरेत विठ्ठलाचा आणि तुकोबांना मान्य असणार्या त्यांच्या ज्ञानदेवनामदेवादी संतांचाही समावेश आहे.
मुखातून माझ्या । बोले तुकाराम ॥
तोच आत्माराम । अभंगाचा ॥
यमकाला शक्ती । देई नामदेव ॥
प्रतिमेचा भाव । पायरीला ॥
अर्थ समाधीत । नांदे ज्ञानेश्वर ॥
माखवी अक्षर । अमृताने ॥
या त्यांच्या ओळी पुरेशा स्पष्ट आहेत. परंतु तरीही कवीचे साक्षात नाते या परंपरेला कलशस्थानी असणार्या तुकोबांशी आहे. कवी तुकोबांना बादशहाअसे संबोधून विनवतो.
तुको बादशहा । देई शब्ददान ॥
करी धनवान । लेखणीला ॥
कवीच्या साठी तुकोबा कवितेचा निकषच आहे. श्लील अश्लीलाचा करी तू निवाडा । भाषेच्या कवाडा उघडोनी॥ तुकोबांना उद्देशून लिहिलेल्या कवितांमधून कवी तुकोबांच्या व इतरांच्याही कवितेची समीक्षा करतो. तुकोबांना तो कवितेचा देव मानतो.
तूच कलदार रोकडीचा दाम । बाकी जोडकाम कुसरीचे ॥
नामदेवांनी तुकोबांना कवित्वाचे वरदान दिले त्याप्रमाणे तुकोबांना तो अगा शब्दराजा, होई कृपावंत । ओत आशयात पंचप्राण ॥ अशी विनवणी करतो. तुकोबांनी कवीला झपाटले आहे. जसे विठ्ठलाने तुकोबांना केले होते.
काय करू आता धरले तुक्याने । जगणे सुखाने आटोपले ॥ तुकोबांनी त्याला अंतर्बाह्य व्यापले आहे.
तुकाराम श्वास तुकाराम ध्यास । सदा आसपास तुकाराम ॥
अर्थात तुकोबांपर्यंतचा त्याचा प्रवास सरळ सोपा वा एकरेषीय नाही. त्यासाठी त्याला स्वत:शीच व प्रचलित काव्यकल्पनांशी संघर्ष करावा लागला आहे. त्याच्या व्याकुळ आकांताला तुकोबा प्रतिसाद देतात -
म्हणे घालविले बेचाळीस वाया । अखेरीस पाया सापडला ॥
बांध ऐपतीने चिरेबंदी वाडा । हुड्यावर हुडा चढवावा ॥
उशिरा पटली मातीची ओळख । घेई आता पीक मनाजोगे ॥
शब्दापाशी ठेव जीव तू गहाण । तुला माझी आण म्हणे तुका ॥
तुकोबांच्या अशा प्रसादतुल्य प्रतिसादाने कवी हरखून जातो.
मिळाला अखेर हक्काचा आसरा । तुकोबा सोयरा झाला माझा ॥
असे जीवलग माझा प्राणासखा । मैतर तो तुका एकमेव ॥
आला वसतीला हृदयात तुका । काय वाण निका सापडला ॥
परंतु तुकोबा कवीला केवळ कवितेपुरते नको आहेत. तुकोबा त्याला तुकोबांच्या परंपरेसकट व जीवनमूल्यांसकट हवे आहेत.
स्फुरे नामयाचा आम्हा भक्तिभाव । झालो उमराव पंढरीचे ॥
ब्रह्मानंदी टाळी लावी ज्ञानदेव । काय आम्हा भेव काळाचे ते ॥
विठोबाचे घरी थांबलो पाहुणे । आता येणे-जाणे करी कोण ॥
तुकोबा कवीला प्रसन्न होतात तेव्हा त्याने तुकोबांना मागितलेले वरदान तुकोबांना साजेल असेच आहे.
तुका झालासे प्रसन्न । माग म्हणे वरदान ॥
काय मागू मी बापडा । शब्द माझ्या कामी पाडा ॥
नको गरुड विमान । नको संतत्वाचा मान ॥
मोक्ष मुक्ती घेई कोण । ज्यासी हुंगेना तो श्वान ॥
आकाशीचा स्वर्गवास । खाऊ कशा संगे त्यास ॥
असे नको काहीबाही । घाल विठोबाचे पायी ॥
तुकोबांचा एवढा ध्यास घेतलेल्या कवीवर तुकोबांचा परिणाम होणे स्वाभाविक आणि अपरिहार्य म्हटले पाहिजे तो काय तर-
फटकळापाशी जाई फटकळ । बोलणे सकळ तोंडफोड ॥
वाण नाही पण लागलासे गुण । संतसंगतीनं तुकोबांच्या ॥
परंतु या स्पष्टोक्तेपणाचा परिणाम जगाचे शत्रुत्व ओढवून घेण्यात झाला-
जळो, तुटो देवा अशी माझी जीभ । काय तिचा लाभ जग वैरी ॥
मग कवीच्या हे लक्षात येते की शब्द उद्दामपणे उधळणे म्हणजे तुकोबांची परंपरा नव्हे. तुकोबांच्या गुणांबरोबर त्यांचा वाणही जगायला हवा. त्यांच्या जिभेवर विठ्ठलाचे अधिष्ठान होते म्हणून त्यांचा फटकळपणा जगाने सहन केला. कवी आता देवालाही विनवतो की,
तुझी नाममुद्रा ठेव तिच्यावर । तेव्हा ताळ्यावर येईल ती ॥
तुकोबांच्या वाणीतील परखडपणाने तुकोबांनी देवालाही अपवाद केले नव्हते. आवश्यक तेथे तुकोबांनी देवाशी वाद करायला मागेपुढे पाहिले नाही.
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥
करितो स्वामीसवे वाद । अधिकाधिक आनंद ॥
अशी त्यांची यामागची भूमिका होती. मग प्रसंगी ते देवाला बरोबरीच्या नात्याने आव्हान देतात तर प्रसंगी आपण जीव या नात्याने देवापेक्षा खालच्या दर्जाचे असू तर देवाचे वागणे कसे अन्यायाचे झाले आहे याचे माप चुकते करतात. राऊतांच्या कविता ही एकविसाव्या शतकातील श्रद्घावंताची कविता आहे. त्यामुळे त्यांनी देवाशी वादसंवादी करणे हे त्यांच्या तुकाराम परंपरेत बसते. पण त्यांची श्रद्घा आता कालमानपरत्वे विज्ञानामधील प्रतिमानांचा उपयोग करते.
हुबेहुब झालो तुझिया पासोन । तुझाच कलोन आहेना मी ॥
खाण तशी माती बाप तसा लेक । मसाला तो एक माझा तुझा ॥
झाली तुझीमाझी सिद्घ एकपेशी । तरी का न घेशी जवळ तू ॥
तुकोबांप्रमाणेच तेही आता देवा सांगू सुखदु:ख मागणे ते तुज मागो या भूमिकेवर आले आहेत. वेगवेगळ्या त्रुटींनी युक्त असलेल्या जीवांना काहीतरी बोनस देऊन पूर्ण करणार्या देवाचे वर्णन करून
अडाण्याला भेट दिला भक्तिभाव । दातार तो देव नाही कसा ॥
असे विचारीत त्याच्या दातृत्वाचे ते कौतुक करतात. परंतु मग आपल्या बाबतीतच हा असा कसा वागतो ?
काय काळ्या तुझ्या पोटातही काळे । आरंभले चाळे मूलसांडे ॥
काय तुला कळे माझी तळमळ । आहेस तू काळ नैवेद्याचा ॥
असे उद्विग्न उद्गार त्यांच्याकडून निघतात.
पण हा त्यांचा उद्वेग तात्कालिक असतो. शेवटी तोच खरा तारणहार आहे याची त्यांना पक्की खात्री आहे. वैद्य एक पंढरीराव अंतरभाव तो जाणे या तुकोक्तीप्रमाणे तेही म्हणतात,
युगे अठ्ठावीस उभा विटेवरी । खरा धन्वंतरी एकमेव ॥
तहानेचे हेच फळ उरफुटी धावपळ ॥
अवघ्यांचे आहे एक दु:खमूळ । अपेक्षिता फळ चुके वर्म ॥
हीच तृष्णा भवरोगांचे मूळ आहे आणि या रोगाची चिकित्सा करून औषध देणारा धन्वंतरी तो आहे, पण तो संतांच्या माध्यमातून भेटतो ते पुरेसे आहे कारण,
भेटल्या होशील तूही तृणवत । म्हणून अप्राप्य भला देवा ॥
ऐहिक आणि पारलौकिक जीवनात तोच खरा आसरा आहे. त्याला विनवणी करायची-
मागे पुढे होई विठ्ठला आरसा । दावी आहे तसा माझा मला ॥
त्याच्याकडे प्रेम मागायची कल्पना तर अत्यंत काव्यात्मक व हृदयंगम आहे.
धरी मजवरी प्रेमाची पाखर । घेई वो सत्वर पोटापाशी ॥
मारण्या भरारी आकाश थोकडे । ऐसे दे रोकडे पंखबळ ॥
तुझिया नामाची करी चिवचिव । जीवातला जीव विठ्ठले वो ॥
अनुभवात, आशयात आणि अभिव्यक्तीत संतसाहित्याशी आणि विशेषत: तुकोबांशी साक्षात नाते जोडणारा हा कवी मराठी कवितेला गवसला याचा आपल्याला आनंदच व्हायला हवा.
__________________________________________
- डॉ. सदानंद मोरे,
तत्त्वज्ञान विभाग,
पुणे विद्यापीठ, पुणे 7
______________________________