मन भ्रमाचे भांडार

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार.

शक्तिविन ओढे गाडी
शिडीविन चढे माडी.

त्याच्या कल्पनेचे यान
येई ब्रह्मांड हिंडोन.

रूप अरूपाला देई
गुण निर्गुणाचे गाई.

त्याच्या भावनांचा वेग
घेई अभोगाचा भोग.

वारियाशी बांधू पाहे
स्वत: बंधनात राहे.

करी पुन्हा त्याच चुका
घेई आभाळाचा मुका.

No comments:

Post a Comment