गुळाहून गोड

गुळाहून गोड
लागे परनिंदा
जीभ या आनंदा
सोकावली.

उंदिराने रोज
काढावा उकीर
याचे - त्याचे थेर
रवंथावे.

कुतर्‍याचे तोंड
चघळे हाडूक
तसे माझे मुख
सुखावते.

निर्दोषाचा जणू
आहे मी पुतळा
चालला सोहळा
अहंकारी.

तुझिया नामाचा
जिभेला चटका,
करील सुटका
ह्याच्यातून.

No comments:

Post a Comment