बसे एका जागी

बसे एका जागी
थकलेले ढोर,
नाही अंगी जोर
उठावया.

तोडण्यास लोंदे
कावळे नि घारी,
उतरती हारी
लागले ते.

हाणण्या शेपूट
मुळी उचलेना
सोसते यातना
मुकाट्याने.

तसा झाला माझा
भागलेला जीव
करी त्याची कीव
विठाई वो !

No comments:

Post a Comment