ऊठ माझ्या जीवा

ऊठ माझ्या जीवा,
चाल बिगीबिगी
उरला ना जगी
कळवळा.

घरी करमेना,
दारी करमेना
मन हे रमेना
कशातच.

नाही मला गोड
लागत भाकर
मीठ नि साखर
सारखेच.

कोण जाणे कधी
लागला भिरूड ?
कसे त्याने झाड
टोकरले ?

सोडुनिया सारे
जाऊ वाटे थेट
घेऊ वाटे भेट
रातभर.

No comments:

Post a Comment